BMC Election : मुंबईत भाजप-शिवसेनेचा जागावाटपाचा जवळपास फॉर्म्युला ठरला, 207 जागांवर एकमत, कोण किती जागा लढणार?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. आता याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच 207 जागांवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे.

BMC Election : मुंबईत भाजप-शिवसेनेचा जागावाटपाचा जवळपास फॉर्म्युला ठरला, 207 जागांवर एकमत, कोण किती जागा लढणार?
google

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीपासून वेगळा आहे. महायुतीत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत सातत्याने बैठका होताना दिसत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, महायुतीत जागावाटपाबाबत जवळपास बऱ्याच जागांवर दोन्ही पक्षांचं एकमत झालेलं आहे. केवळ 20 जागांवर आता पेच असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत भाजप आणि शिंदे गटात 207 जागांवर एकमत झालं आहे. पण तरीदेखील 20 जागांवर पेच कायम आहे. आतापर्यंत ठरलेल्या जागावाटपानुसार भाजपच्या वाटेला निवडणूक लढण्यासाठी 128 जागा आणि शिवसेना शिंदे गटाला 79 जागा देण्याबाबत एकमत झाल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी महायुतीच्या बैठकांनंतर याबाबत महत्त्वाची माहिती देखील दिली आहे.

अमित साटम काय म्हणाले?

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. "भाजप 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवर आमचं एकमत झालेलं आहे. उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरु आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन लवकरच उरलेल्या 20 जागांचा तोडगाही काढण्यात येईल", अशी माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिली.

शिवसेनेची भूमिका काय?

शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. "भाजप 128 आणि शिवसेना 79 अशा जागांवर आमची सहमती झाली आहे. तर उरलेल्या 20 जागांवर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील", अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.

ठाकरे बंधूंचं काय ठरलं?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आता युती झाली आहे. दोन्ही नेत्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. पण अजूनही दोन्ही नेत्यांकडून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. दोन्ही नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षदेखील एकत्र निवडणूक लढवू शकतो अशी शक्यता आहे. पण जागावाटपावर जाहीर झाल्यानंतरच याबाबत उलगडा होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.